चांदवड तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा आणि सौर पंपांच्या तक्रारींबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे महावितरणला निवेदन


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा आणि लोडशेडिंगचा मोठा फटका बसत आहे. अवेळी वीजपुरवठा आणि सतत होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतीच्या सिंचनावर विपरीत परिणाम होत असून, शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. या संदर्भात चांदवड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपअभियंता सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश रमेश निंबाळकर, तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी वीज वितरण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे हाल

सध्या चांदवड तालुक्यात शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा अनियमित आणि अवेळी दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा दिला जातो, तर दिवसा लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यातच ट्रान्सफॉर्मर जळाल्यास महावितरणचे कर्मचारी “खाजगी ठिकाणाहून ट्रान्सफॉर्मर भरून आणा किंवा आठ-दहा दिवस वेट करावा लागेल” असे सांगत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

सौर पंप धोरणाचा फसवा कारभार

राज्य सरकारने “मागेल त्याला सौरपंप” असे धोरण जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सौर पंप मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना सौर पंप मंजूर झाले आहेत, त्यांचा वेळेवर मेंटेनन्स होत नाही, तर अनेक कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही सौर पंप कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे.

महावितरणला ‘प्रहार स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

महावितरण आणि सौर पंप कंपन्यांच्या हेळसांडीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

“महावितरण आणि सौर कंपन्यांनी वेळेत निर्णय न घेतल्यास ‘प्रहार स्टाईल’ने आंदोलन करून न्याय मिळवू,” असा ठाम इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी महावितरण आणि सौर पंप कंपन्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा उग्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा निर्धार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

पत्रकार -

Translate »