कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :चांदवड तालुका कायमच अवर्षणग्रस्त असल्याने येथे बारमाही पाणीपुरवठा करणारे मोठे धरण किंवा पाट उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. परिणामी, फळबागांचे प्रमाण तुलनेने कमी असून, पारंपरिक पद्धतीने कमी पाण्यात शेती केली जाते.

डिसेंबर ते जानेवारी महिन्यात विहिरींना तळ लागत असल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी शेततळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या तळ्यांमधील पाणी मर्यादित प्रमाणात वापरून शेतकरी रब्बी हंगामात कांदा, द्राक्षे, डाळिंब, गहू यांसारखी पिके घेत आहेत. कमी पाण्यात टिकणाऱ्या फळझाडांमध्ये चिंच, आंबा, बोर, शेवगा, सिताफळ यांची काही प्रमाणात लागवड केली जात आहे. तसेच, काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आणि शेततळ्यांच्या कडेला आंबा व शेवग्याची झाडे लावली आहेत.

या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने तालुक्याच्या दक्षिण भागातील विहिरी जानेवारीच्या सुरुवातीलाच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात सर्वच पिकांचे उत्पादन सरासरीच्या तुलनेत घटले आहे. कमी पावसामुळे फळझाडांना फुलोरा आला असला तरी प्रतिकूल हवामानामुळे 40 ते 60 टक्के फुलकळी गळून पडली आहे, अशी माहिती उर्धुळ येथील शेतकरी जयवंतराव खुटे यांनी दिली.

तसेच, उष्णता व वारंवार बदलणाऱ्या वाऱ्यांमुळे आंब्याच्या फुलोऱ्यावरही विपरीत परिणाम झाला असून, गळ होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असे दिघवद येथील शेतकरी वसंत कोल्हे यांनी सांगितले.

चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगली आणि फळझाडांची लागवड केली जात असली, तरी पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. एप्रिल ते जून महिन्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होते, परिणामी झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि फळबागांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.

यंदा आंबारसाठी व लोणच्यासाठी आंबे व कैरी महागण्याची शक्यता

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »