माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून दिघवद विद्यालयात डिजिटल वर्ग

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेवरील प्रेमातून डिजिटल वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली.
“आवडते मज मनापासून शाळा” या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शाळेचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून माजी विद्यार्थी उमेश निंबाळकर यांनी गणेश निंबाळकर यांच्या सहकार्याने ग्लॅसको कंपनीच्या माध्यमातून विद्यालयाला डिजिटल वर्ग प्रदान केला.
या डिजिटल वर्गाच्या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे, उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे, शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे, संचालक, शिक्षक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उमेश निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजेनुसार आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच, विद्यार्थी व शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल वर्गाचा प्रभावी उपयोग करावा, असे आवाहन केले. पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून आणि माजी विद्यार्थी मित्रांच्या सहकार्यातून आणखी डिजिटल वर्ग उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात शिक्षक सुनील चंदनशिव यांनी खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक प्रभावी करता येते, यावर प्रकाश टाकला. तसेच, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार किशोर गांगुर्डे यांनी मानले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी, पर्यवेक्षक इंद्रभान देवरे, उपशिक्षक सुरेश सोनवणे, अर्जुन गांगुर्डे, शशिकांत पाटील, सुनील गांगुर्डे, प्रभाकर पेंढारी, अमोल ठोंबरे, संदीप पाटील, गणेश गांगुर्डे, मधुकर गोसावी, सागर गांगुर्डे, धनंजय गांगुर्डे, साहेबराव घोलप, कलुबाई साबळे, रेणुका कानडे, सुनिता राठोड आदी उपस्थित होते.
