वर्षभरापूर्वी चोरीला गेलेल्या मोबाईलचा  लावला : चांदवड पोलिसांची विशेष कामगिरी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):  दि. 22 चोराने चोरी केलेली वस्तू कितीही क्लुप्त्या करून आटोकाट लपविण्याचा प्रयत्न जरी केला, तरी पोलीस हे त्यांच्या मुळापर्यंत जातातच. याचा प्रत्यय चांदवड पोलिसांच्या बाबतीत बघावयास मिळाला. वर्षभरापूर्वी चोरीला गेलेला मोबाईल फोनचा छडा लावण्यात चांदवड पोलिसांना यश मिळाल्याने त्यांच्या या कामगिरीचे जनतेतून कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रेडगाव येथील विजय काळे यांचा ओपो कंपनीचा 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन सोमवार दि. 26 मे 2024 रोजी चांदवड येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अज्ञात भामट्यांनी लंपास केला होता. काळे यांनी याबाबतची माहिती चांदवड पोलिसांना दिली होती. पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रदीपसिंग सोळंकी यांनी सदर मोबाईल ट्रॅप केला. मात्र सदर भामट्याने अनेक महिने मोबाईल फोन बंद ठेवल्याने तपासात अडचणी येत होत्या .मात्र भामटा कधी ना कधी एक दिवस मोबाईल चालू करेल याची वाट पोलीस बघत होते. अखेर भामट्याने फोन चालू करताच चांदवड पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन मिळविले. सदर मोबाईल धापेवाडा ता. कळमेश्वर जिल्हा नागपूर या ठिकाणी आढळून आला. सदर चोरटी व्यक्ती आडू माडू भाषा बोलत असल्याने तपासात भाषेचाही काही अंशी अडसर येत होता. मात्र या सर्वांवर पोलिसांनी मात करत सदर चोरीला गेलेला मोबाईल मिळविण्यात यश मिळविले. आज बुधवार दि. 21 रोजी सदर मोबाईल विजय काळे यांना पोलिसांनी सुपूर्द केला. दैनंदिन व्यस्त आणि महत्त्वाची कामे सांभाळून पोलिसांनी वर्षभरापूर्वी चोरीला गेलेला मोबाईलचा छडा लावल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पत्रकार -

Translate »